रेणापूर : तालुक्यातील अर्ध्या गावांची तहान भागवणारा व अनेक गावांतील शेतीसाठी वरदान ठरलेला भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात यंदाच्या पावसाळ्यात भर पडलेली नाही. सध्या केवळ २४.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, आगामी काळात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, परतीच्या पावसात धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा होईल, अशी अपेक्षा आहे.
रेणापूर तालुक्यात व्हटी व रेणा मध्यम हे दोन प्रकल्प मोठे आहेत. रेणा मध्यम प्रकल्पावर रेणापूर शहरासह दहा खेडी, पानगाव बारा खेडी, कामखेडा पाच खेडी, पट्टीवडगाव, खरोळा या गावांच्या नळयोजना अवलंबून आहेत. मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला होता; मात्र यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षित पाणी प्रकल्पात आलेले नाही.
यावर्षी रेणापूर तालुक्यात मृग नक्षत्रात पाऊस पडला नाही; मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. तालुक्यात पिकांसाठी पोषक असा पाऊस काही दिवस पडला व पिके बहरली; मात्र ४ महिन्यांत दमदार, मोठा पाऊस न झाल्याने आजही नदी, नाले, ओढे वाहिले नाहीत. तसेच अर्धा तालुक्याची तहान भागवणाऱ्या रेणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा दमदार पाऊस न झाल्याने पाणीसाठा झालेला नाही. सध्या रेणा प्रकल्पात २४.८५ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध असून नागरिकांतून पुढील काळात पाण्यासाठी चिंता व्यक्त केली जात आहे.
तालुक्यासाठी सिंचन व नळपाणीपुरवठ्यासाठी वरदान ठरलेल्या रेणा मध्यम प्रकल्पात पाणीसाठा होण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. पावसाळ्याचे ४ महिने उलटले तरीही प्रकल्पात पाणीसाठा झालेला नाही. या धरणात पाणीसाठा होण्याची आशा फक्त आता होणाऱ्या परतीच्या पावसावर राहिली आहे. गेल्या तीन-चार वर्षांचा इतिहास पाहिला तर रेणा प्रकल्पामध्ये पावसाळा काळात प्रकल्प भरत नाही, त्यामुळे सतत तालुक्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. गेल्या तीन वर्षांपासून परतीच्या पावसाने रेणा मध्यम भरत आहे. या वर्षाचीही तीच परिस्थिती निर्माण झाली असून, आता फक्त परतीच्या पावसावरच रेणा धरण भरण्याची आशा राहिली आहे.
५.१०८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा...रेणा मध्यम प्रकल्पात सध्या उपयुक्त पाणीसाठा ५.१०८ दलघमी, मृत पाणीसाठा १.१३ दलघमी असून, एकूण पाणीसाठा ६.२३७ दलघमी आहे. पाण्याची टक्केवारी २४.८५ असून, मागील वर्षी या दिनांकास एकूण पाणीसाठा २१.५८६ दलघमी होता. अर्थात धरण पूर्ण क्षमतेने भरलेले होते; मात्र यंदा पावसाळ्याचे चार महिने झाले तरी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात कोणतीही भर पडलेली नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे.
प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित...यंदा धरण क्षेत्रात पाऊस न झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली नाही. पाणीपुरवठा योजना आहेत, त्यांनी भविष्याचा विचार करून काटकसरीने पाण्याचा वापर करून येणारी पाणीटंचाई टाळावी, धरण क्षेत्रातील सर्व विद्युत मोटारी २१ सप्टेंबरला बंदची कार्यवाही करण्यात आली असून, प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवले असल्याचे प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.