जळकोट : तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दहा दिवसांपासून कमी झाली आहे. येथील कोविड केअर सेंटरमध्ये सध्या केवळ ५ रुग्ण आहेत. आतापर्यंत १ हजार ५७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळत आहे.
जळकोट तालुक्यात एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे नागरिकांना धास्ती बसली होती. संसर्ग रोखण्यासाठी महसूल, पंचायत समिती, आरोग्य, पोलीस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात येऊन जनजागृती करण्यात आली. तसेच ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांची काटेकारेपणे अंमलबजावणी करण्यात आली. आरोग्य विभागाने चाचण्यांवर भर देऊन बाधितांना वेळेवर उपचार दिले.
तालुक्यात १ हजार ६४४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हा आरोग्य विभागाने उपचार केल्याने १ हजार ५७५ जण ठणठणीत झाले आहेत. तालुक्यात कोरोनामुळे ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या केवळ ३६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातील १३ जण हे गृहविलगीकरणात आहेत. १६ रुग्णांना उदगीर, लातूरला रेफर करण्यात आले आहे. येथील कोविड केअर सेंटरमध्ये केवळ ५ रुग्ण उपचार घेत आहे. ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये केवळ दोन रुग्ण उपचार घेत आहेत.
जळकोट शहरात सध्या कोरोनाचे ११ रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांनी दिली. तालुक्यातील एकुरका, सिंदगी, लाळी, वांजरवाडा, धामणगाव या गावांतील कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. सध्या कोरोनाचा आलेख घसरला आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे...
जळकोट तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. आतापर्यंत १ हजार ५७५ जण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. नागरिकांनी शासन नियमांचे पालन करावे. कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्स राखावा, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांनी केले आहे.