लातूर : काँग्रेसने देशात भ्रष्टाचाराचा पॅटर्न तयार केला होता. मात्र, मागील दहा वर्षांत देशात देशसेवेचा, राष्ट्रभक्तीचा आणि प्रगतीचा मोदी पॅटर्न चालत आहे. बाकी सगळे पॅटर्न भंगारात गेले, अशा कठोर शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर प्रहार केला.
लातूर येथे मंगळवारी आयोजित प्रचारसभेत मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेसचा पारंपरिक गड दहा वर्षांपूर्वीच लातूरकरांनी उद्ध्वस्त केला. आता लातूर जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला झाला आहे. मेरे शरीर का हर कण, मेरे समय का हर क्षण देश को समर्पित है, असे पंतप्रधान आपल्याला सांगतात. २०-२० तास काम करणारे आपले नेतृत्व आहे. त्यांची ऊर्जा ईश्वरी कृपा असून त्यांच्याकडून ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
काँग्रेसवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेसकडे लॉन्च न होणारा युवराज आहे. आपल्याकडे व्हिजन, समृद्धीचे धोरण आहे, त्यांच्याकडे राजकारण आहे. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी घोटाळ्यांची मालिका ऐकत होतो. आता केंद्र सरकारच्या योजनांचा बोलबाला ऐकतो आहोत. त्यामुळे खरी गरिबी हटविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लातूरला दुष्काळमुक्त करण्यासाठी अनेक सिंचनाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पाण्यासाठी आता जनतेला वणवण फिरावे लागणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
अस्थिर सरकारने नुकसानच...देशाने ३० वर्षे अस्थिर सरकारे बघितली आहेत. त्यावेळी अधोगती आणि भ्रष्टाचार बघितला आहे. अस्थिर सरकारांमुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले; परंतु गेल्या १० वर्षांत स्थिर सरकार बघितले आहे. देशाला स्थिर सरकारची गरज आहे. स्थिर सरकार देण्याची ताकद फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनगटात असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.