मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं पहिल्या १२५ जणांची यादी मंगळवारी जाहीर केली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह दिग्गजांचा समावेश आहे. तसेच भाजपाच्या पहिल्या यादीत लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे ओएसडी/पीए अभिमन्यू पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अभिमन्यू पवार यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर औसा विधानसभेतील स्थानिक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे.
विधानसभेसाठी लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून अभिमन्यू पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच अभिमन्यू पवार मुख्यमंत्र्यांचे ओएसडी/पीए यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठा विरोध केला आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांचे पीए नको स्थानिक भूमिपुत्र द्या अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील आणि औसामधील काही कार्यकर्त्यांनी याचा निषेध करत आज राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता.
शिवसेनेने १९९९ आणि २००४ साली औसामध्ये बाजी मारली होती. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाला सोडण्यासाठी शिवसेना फारशी उत्सुक नव्हती. शिवसेनेला दोनदा मिळालेला विजय सोडल्यास बाकीच्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं औसात वर्चस्व राखलं. सध्या काँग्रेसचे बसवराज पाटील औसाचं प्रतिनिधीत्व करतात. बसवराज पाटील यांनी २००९ मध्येही विजय मिळवला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपकडून पाशा पटेल निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र त्यांना पराभव पत्करला. त्यामुळे आता मुख्यमंत्र्याचे ओएसडी बाजी मारणार की बसवराज पाटील वर्चस्व राखणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.