लातूर : काेराेना प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच राखीपाैर्णिमेचा उत्साह बाजारपेठेत दिसून येत आहे. शाळा-महाविद्यालयातही रक्षाबंधन साजरा करण्यासाठीची लगबग सुरु आहे. तर लातूर जिल्हा पाेलीस दलाने यंदा विधायक राखीपाैर्णिमा साजरी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लातुरातील नांदेड राेडवर असलेल्या एसओएस बालग्राममधील अनाथ मुला-मुलींसाेबत राखीपाैर्णिमा साजरी केली जाणार आहे. यातून त्यांना पाेलीस दादांच्या कारभाराची ओळख हाेणार आहे.
दरवर्षी राखीपाैर्णिमेनिमित्त विविध सामाजिक संघटना, बचत गटांच्या महिला पाेलीस आणि संरक्षण दलात कार्यरत असलेल्या जवानांना राखी बांधण्यासाठी येतात. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांना टपालाने, कुरियरने राखी पाठविली जाते. आता यंदाची राखी पाैर्णिमा साजरी करताना विधायक पद्धतीने साजरी करण्याचा मानस जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी लातुरातील एसओएस बालग्राममधील अनाथ मुलांचा सहभाग यंदाच्या राखपाैर्णिमा सणात राहणार आहे. त्यासाठी पाेलीस प्रशासनाने तयारी केली आहे. अनाथ मुला-मुलींना पाेलीस प्रशासनाचे कामकाज कसे चालते याबाबतची माहिती दिली जाणार आहे. पाेलीस अधीक्षक कार्यालय, पाेलीस मख्यालयाची सफर त्यांच्यासाठी घडविण्यात येणार आहे. मुख्यालयात मांडण्यात येणाऱ्या शस्त्राचे प्रदर्शनातून पाेलीस दलाबाबत प्रबाेधन केले जाणार आहे. शस्त्र कसे चालवावे, त्याचे महत्व, त्याची क्षमता याबाबत पाेलीस प्रशिक्षण केंद्रातील अधिकाऱ्यांकडून दिली जाणार आहे, असेही पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले.
ताणतणाव दूर करण्याचा प्रयत्न...
पाेलीस कर्मचाऱ्यांना बारा-बारा तास काम करावे लागते. सततची दगदग आणि ताणतणाव यामुळे आराेग्यावर परिणाम हाेत असल्याने अनेक व्याधी वयाच्या चाळीशीनंतर उद्धभवत आहेत. यावर मात करण्यासाठी ताणतणाव दूर करणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित व्यायाम, उत्तम आहार आणि मनशांतीसाठी मेडिटेशनची गरज आहे. यासाठीही उपक्रमाचे आयाेजन केले आहे.