चाकूर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून तालुक्यात एकूण ८५ गावे असून सर्वच गावांत संसर्ग झाला आहे. तो रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. सध्या तालुक्यात ९५७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
कोरोनाची दुसरी लाट तालुक्यात सुसाट आहे. ती रोखण्यासाठी आरोग्य, महसूल, पंचायत समिती, पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. ब्रेक द चेनअंतर्गत लागू करण्यात आलेल्या नियमांची कडकपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. तालुक्यातील होम आयसोलेशनमधील रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तसेच नगरपंचायतीने शहरात १८ पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकात सहा जणांचा समावेश असून या पथकाच्या माध्यमातून गृहविलगीकरणातील व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
गृहविलगीकरणातील व्यक्तींवर पथकांची नजर...
संसर्ग रोखण्यासाठी कोरोनाची लक्षणे जाणवणा-या व्यक्तींनी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. तसेच होमआयसोलेशनमधील व्यक्तींनी घराबाहेर पडू नये म्हणून त्यांच्यावर पथकाद्वारे नजर ठेवण्यात आली आहे. प्रत्येकाने काळजी घ्यावी.
- डॉ. अर्चना पंडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी.
विनाकारण फिरणा-यांवर गुन्हे...
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदीसह कडक नियम करण्यात आले आहेत. काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून येत आहे. अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश ग्रामसेवकांना देण्यात आले आहेत. सर्वांनी नियमांचे पालन करावे. कोविड लस घ्यावी.
- डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार.
चौकट...
एकूण बाधित : २९०३
उपचारानंतर बरे : १८८८
ॲक्टिव्ह रुग्ण : ९५७
मयत : ५८
होम आयसोलेशन : ६०४
कोविड केअर सेंटर : १४२
तालुक्यात एकूण ८५ गावे आहेत. सर्वच गावात रुग्ण आढळून येत आहेत. सर्वाधिक रुग्ण चाकुर शहरात आढळले असून २०६ अशी संख्या आहे. लिंबाळवाडीत ७५, नळेगाव- ७३, सीमा सुरक्षा प्रशिक्षण केंद्र- ३६ तसेच चापोलीत ३५ कोरोना बाधित आढळून आले आहेत.