डिगोळ : वातावरणातील बदलामुळे डिगोळ परिसरातील हरभऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त असताना आता गव्हाच्या पिकावरही मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पीक पिवळे पडून वाळत आहे. त्यामुळे शेतकरी नव्या संकटात सापडले आहेत.
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ व परिसरात परतीच्या पावसामुळे नदी, नाले, विहिरी, बोअर तुडुंब भरल्याने जलस्त्राेतांची पाणी पातळी वाढली. त्यामुळे या भागात रब्बीचा पेरा वाढला आहे. परिसरातील शेतकरी सिंचनद्वारे रब्बी पिकांसह भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. दरम्यान, वातावरणातील बदलामुळे रब्बी पिकांवर परिणाम दिसून येत आहे.
अति पावसामुळे खरिपातील सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रब्बीवर आहेत. गेल्या आठवड्यापासून वातावरणात बदल झाला आहे. दिवसा कडक उन्हं, रात्री थंडी तर पहाटे धुके पडत आहेत. त्याचा परिणाम रब्बी पिकांवर होत आहे. सुरुवातीला हरभऱ्यावर रोगाचा प्रार्दुभाव झाला. आता गव्हावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पीक पिवळे पडून सुकत आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.
कृषी विभागाने मार्गदर्शन करावे...
यंदाच्या हंगामात जोरदार पाऊस झाल्याने हाता- तोंडाशी आलेल्या सोयाबीनला फटका बसला. आता वातावरणातील बदलाचा रब्बीतील गव्हावर परिणाम झाला आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा येथील शेतकऱ्यांतून होत आहे.