उदगीर : तालुक्यातील सर्व भागात सतत ५- ६ दिवस कमी- जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने खरिपातील पिकांना लाभ झाला असला तरी, भाजीपाला उत्पादकांना फटका बसला आहे. रिमझिम पावसामुळे भाजीपाल्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. दरम्यान, बाजारपेठेत भाजीपाल्याला चांगली मागणी असली तरी, दर्जा खालावल्याने दरात घसरण झाली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक संकटात सापडले आहेत.
यंदा मृगाच्या प्रारंभी पाऊस पडल्याने खरिपाचा वेळेवर पेरा झाला. दरम्यान, यंदा सोयाबीनचा पेरा वाढला आहे. तालुक्यातील कुमठा, हेर, लिंबगाव, तोंडार, माळेवाडी आदी भागातील बहुतांश शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. नेहमीप्रमाणे पावसाळ्याच्या तोंडावर या भागातील शेतक-यांनी पालेभाज्या व फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु, मागील सहा दिवसांपासून तालुक्यात सतत भिज पाऊस होत आहे. हा पाऊस पोषक ठरण्याऐवजी तोडणी करून विक्रीसाठी तयार असलेल्या भाजीपाल्यास मारक ठरत आहे.
हिरवी मिरची, कोथिंबीर, दोडका, वांगी, टोमॅटो, फ्लॉवर, पत्ता गोबी, शिमला मिरची यासारख्या भाजीपाल्यास या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. भाजीपाला हा जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे भाजीपाल्याची काढणी केलेले शेतकरी तो त्याचदिवशी बाजारात विक्रीसाठी नेतात. त्यामुळे दर चांगला मिळतो. परंतु, सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचा दर्जा घसरला आहे. बाजारपेठेत मागणी असूनही असा भाजीपाला ग्राहक खरेदी करीत नसल्याने फटका बसत आहे. दरम्यान, भाजीपाल्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी विविध औषधांची फवारणी करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
टोमॅटो टाकावे लागताहेत बांधावर...
सततच्या पावसामुळे तालुक्यातील बहुतांश भागातील टोमॅटो उत्पादकांना फटका बसला आहे. टोमॅटोवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने दर्जा घसरला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना टोमॅटो शेतातून काढून बांधावर टाकावे लागत आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक हतबल झाले असल्याचे पाहावयास मिळत आहे.
यंदा उत्पन्न चांगले होईल, या आशेने अडीच एकर शेतीत अडीच लाख रुपये खर्चून वांगी व टॉमेटोची लागवड केली होती. परंतु, सततच्या पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे दर्जा घसरला. परिणामी, लागवडीचाच नव्हे, तर मजुरांचाही खर्च निघत नसल्याची खंत तालुक्यातील पिंपरी येथील शेतकरी बळवंत पटवारी यांनी व्यक्त केली.