लातूर : मसलगा तलावांतर्गत शिवणी कोतलनजीक असलेल्या झाडांवरील रंगीत करकोचांच्या घरट्यांची नासधूस करीत त्यातील १४ पिल्ले शिकारीच्या उद्देशाने खाली पाडण्यात आली. त्यात सात पिल्लांचा मृत्यू झाला असून, रविवारी हा प्रकार गावकऱ्यांच्या प्रसंगावधानाने उघडकीस आला. हे पक्षी पोत्यात भरून नेणाऱ्या शिकाऱ्यांना गावकऱ्यांनी अडवले व वनविभागाच्या ताब्यात दिले.
शिवणी कोतल येथील या तलावाकिनारी असलेल्या झाडांवरील घरट्यांत सुमारे २५० रंगीत करकोचे त्यांच्या ४०० पेक्षा अधिक पिल्लांसह राहत आहेत. जून २०२२मध्ये पक्षिमित्र धनंजय गुट्टे यांनी ही वसाहत शोधली होती. त्यावेळपासून हे ठिकाण प्रकाशात आले होते. विशेष म्हणजे या वसाहतीचे संरक्षण व्हावे यासाठी आ. धीरज देशमुख यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना साकडे घातले होते. बीएनएचएसच्या तज्ज्ञांनी या वसाहतीची पहाणी करून तिच्या संरक्षण व संवर्धनाची अनिवार्यता सांगितली होती. नुकतीच मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर यांनीही या वसाहतीस भेट देऊन संवर्धनाच्या दृष्टीने वसाहतीकडे विशेष लक्ष पुरवण्याच्या सूचना वनाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
दरम्यान, रविवारी सकाळी तलावानजीक असलेल्या बाभळीच्या झाडापाशी तीन अनोळखी माणसे आली व त्यांनी ते झाड जोरजोराने हलविण्यास सुरुवात केली. त्यामुळे घरट्यातील काही पिल्ले जमिनीवर पडली, त्यानंतर ते घरट्यावर काठ्या मारू लागले हा प्रकार तेथून हाकेच्या अंतरावर असलेले शेतकरी स्वरूप शेळके, रमेश शेळके, सुधाकर आयतनबोने, नागेश पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांनी पाहिला व ते ओरडत त्याच्याकडे धावले तोपर्यंत त्यांनी १४ पिल्ले पोत्यात कोंबली होती. ते येताच त्यांनी पोत्यातील पक्षी काढले. तथापि, जखमी झाल्याने व गुदमरल्याने सात पक्षी मरण पावले होते. एका जखमी पक्ष्याच्या चोचीवाटे रक्त येत होते. जैवविविधता समिती सदस्य शहाजी पवार, धनंजय गुट्टे यांनी घटनास्थळास भेट दिली. वनकर्मचारी दगडू कोरे, विनायक वजीरे, सोपान बडगणे यांनी पंचनामा करून शिकाऱ्यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडील मोटारसायकल व दोन मोबाइल त्यांनी जप्त केले. सहा पिल्लांना पुन्हा घरट्यांत सोडण्यात आले.
कायमस्वरूपी गार्ड नेमण्याची मागणी...या पक्ष्यांपासून आम्हाला कसलाही त्रास नाही. त्यांची शिकार करणाऱ्याला कठोर शिक्षा करावी व पक्ष्यांच्या संरक्षणासाठी चोवीस तास गार्ड नेमावा, अशी मागणी स्वरूप शेळके, महेश शेळके व गावकऱ्यांनी केली.