फाजिल आत्मविश्वासाने माझा पराभव : शिवराज पाटील चाकूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 01:52 PM2018-10-09T13:52:35+5:302018-10-09T14:23:30+5:30
सलग ३५ वर्ष राजकारणात स्वच्छ प्रतिमा जपत कार्य केले तरी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
चाकूर ( लातूर ) : नगरपालिकेपासून विविध अकरा निवडणुका मी जिंकल्या. मात्र २००४ ची लोकसभा निवडणूक अगदी सोपी आहे असा फाजिल आत्मविश्वास कार्यकर्त्यानी दाखविला. यामुळे माझा पराभव झाला असा उलगडा माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी आज येथे केला.
रोटरी क्लबच्यावतीने चाकूर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा स्वागत समारंभ कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयात घेण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा जेष्ठ कॉंग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या दरम्यान अॅड्. युवराज पाटील यांनी चाकूरकर यांना सलग ३५ वर्ष राजकारणात स्वच्छ प्रतिमा जपत कार्य केले तरी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला असा प्रश्न विचारला.
यावर उत्तर देतांना तब्बल १४ वर्षांनी चाकूरकर यांनी पराभवाच्या कारणाचा उलगडा केला. ते म्हणाले, नगरपालिकेपासून विविध अकरा निवडणुका मी जिंकल्या. मात्र लोकसभा निवडणूक अगदी सोपी आहे असा फाजिल आत्मविश्वास कार्यकर्त्यानी दाखविला. यामुळे माझा त्या निवडणुकीत अगदी नवख्या उमेदवारांकडून पराभव झाला. राजकारणात आलेल्या नव्या नेतृत्वाने गाफील राहू नये असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला.
२००४ ला होते प्रधानमंत्री पदाचे दावेदार
राजकीय कारकिर्दीत सातत्याने यश मिळत असतांना सन २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या नवख्या उमेदवार रुपाताई पाटील निलंगेकर यांनी चाकूरकर यांचा पराभव केला होता. नगराध्यक्ष ते लोकसभा सभापती असा दांडगा अनुभव असलेले चाकूरकर या निवडणूकीत विजयी झाले असते तर ते पंतप्रधानपदाचे दावेदार ठरले असते असे अनेक राजकीय विश्लेषकांचे आजही मत आहे.
चढा आलेख असणारी राजकीय कारकीर्द
चाकूरसारख्या छोटय़ा गावात जन्मलेल्या शिवराज पाटलांनी आपले नाव देशपातळीवर केले. लातूरच्या नगराध्यक्षापासून केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत त्यांची राजकीय कारकीर्द चढत्या क्रमाने गाजली. दयानंद विधी महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी करीत व लातूरच्या न्यायालयात वकिली व्यवसाय करून जीवन व्यतीत करण्याचा त्यांचा मानस होता. पण मित्रांच्या आग्रहाखातर त्यांनी लातूर नगरपालिकेची निवडणूक लढवली व जिंकली. त्यानंतर विविध निवडणुका जिंकत राजकीय कारकिर्दीतील यशाने त्यांची संगत धरली. नगराध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती या चढत्या क्रमानंतर खासदार, केंद्रीय राज्यमंत्री, केंद्रीय कॅबिनेट मंत्री त्यानंतर लोकसभेचे सभापती, केंद्रीय गृहमंत्री, पंजाबचे राज्यपाल अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे.