- हरी मोकाशे
लातूर : बाळंतपणासाठी वापरण्यात येणाऱ्या आॅक्सिटोसीन इंजेक्शनचा वापर काही शेतकरी पशुधनामध्ये दूध वाढविण्यासाठी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने हे इंजेक्शन आता थेट स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून केली जाणार आहे.
ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांना पशुधनाचे दूध वाढविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या औषधासंदर्भात माहिती नसते. पशुवैद्यकीय दवाखान्यांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लिहून दिलेले औषध ते आणत असतात. काही मेडिकल दुकानदार हे शेतकऱ्यांची दिशाभूल करून आॅक्सिटोसीन इंजेक्शन देतात. हे शेतकरी पशुवैद्यकीय दवाखान्यातील कम्पाऊंडरमार्फत आपल्या पशुधनास अशाप्रकारचे इंजेक्शन देत असतात, हे केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. या इंजेक्शनच्या वापरासंदर्भात आरोग्य विभागाकडे तक्रारीही दाखल झाल्या होत्या. वास्तविक आॅक्सिटोसीन इंजेक्शन हे महिलांच्या बाळंतपणाच्या कालावधीत वापरले जाते. मात्र खाजगी मेडिकल दुकानदार त्याचा गैरवापर करीत पशुधनाचे दूध वाढविण्यासाठी करीत असल्याचे आढळले आहे. परिणामी, पशुधनाचे दूध वाढत असले तरी या दुधामध्ये काही घटक उतरून ते मानवी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. अशा प्रकारे होणारा गैरप्रकार थांबावा, यासाठी केंद्र सरकारने नवे पाऊल उचलत सदरील इंजेक्शन हे आता मेडिकल दुकानावर विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे. त्याची अंमलबजावणी येत्या १ सप्टेंबरपासून केली जाणार आहे. शासनाची कंपनी करणार उत्पादन आॅक्सिटोसीन इंजेक्शनची निर्मिती ही आता शासनाची कंपनी करणार आहे. येत्या १ सप्टेंबरपासून हे इंजेक्शन मेडिकल दुकानांवर विक्री करता येणार नाही. स्त्री रोग तज्ज्ञांना थेट कंपनीकडूनच मागवावे लागणार आहे. यासंदर्भात स्त्री रोग तज्ज्ञांना माहिती देण्यात आली असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त किशोर चांडक यांनी सांगितले.