आशपाक पठाण/ लातूर: रस्त्यावर रूपया पडला तर कोण कोणाला विचारायला तयार नाही. ५० हजारांची रक्कम अन् तीही शासनाची. पानविक्रीचा फिरून व्यवसाय करणार्या लातूर शहरातील खोरी गल्ली येथील रहिवासी शेख पाशा मैनोद्दीन यांनी आपल्या खात्यावर चुकून जमा झालेली ५० हजारांची रक्कम लातूरच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे परत केली. यामुळे पाशा शेख यांचे कौतुक होत आहे.
खोरी गल्लीतील पाशा शेख यांचे वडिल मैनोद्दीन शेख (७८) यांचे ९ डिसेंबर २०२० मध्ये कोरोनाने निधन झाले. राज्य शासनाने कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्याची जाहिर केल्यावर पाशा शेख यांनी प्रशासनाकडे अर्ज केला होता. अर्ज करून बरेच दिवस झाल्यावरही आपण दिलेल्या खात्यावर रक्कम कशी जमा झाली नाही, यावर ते चिंतेत होते. आधार लिंक असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या त्यांच्या खात्यावर २८ फेब्रवारी २०२२ रोजी ५० हजार रूपये जमा झाले. ती रक्कम उचचली असता पुन्हा एकदा ५० हजार रूपये जमा झाले.
१ एप्रिल २०२२ रोजी दुसर्यांदा रक्कम झाल्यावर पाशा शेख यांनी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे संपर्क साधला. आपल्याला ५० हजार रूपये शासनाकडून अधिकचे आल्याचे सांगत त्यांनी ती रक्कम आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे परत केली. त्यांच्या या प्रमाणिकपणाबद्दल शहरात कौतुक होत आहे. विशेष म्हणजे त्यांनी प्रशासनाच्या खात्यावर परत केलेल्या रकमेची पावती मंगळवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सादर केली. यावेळी पाशा शेख यांचा सत्कार करून त्यांच्या प्रमाणिकतेचे कौतुक करण्यात आले.
पानविक्रीतून चालतो घरगाडा- लातूर शहरातील पानटपरीवर लागणारे साधे, कलकत्ता पान मी फिरून विक्री करतो. यातून दररोज ४०० ते ५०० रूपये रोजगार मिळतो. यावर कुटुंबांचा घरगाडा चालतो. फुकटचं धन कधी पचतं का असे सांगत पाशा शेख म्हणाले, मला प्रशासनाकडून दुसर्यांदा मिळालेले ५० हजार रूपये मी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे परत केले.