खरोसा : औसा तालुक्यातील खरोसा ग्रामपंचायतींच्या १३ जागांसाठी निवडणूक होत आहे. ५ प्रभागापैकी तीन प्रभागातील जागा आरक्षित असल्याने या प्रभागातील उमेदवार भावी सरपंच होऊ शकतो, असे गणित मांडत पॅनलप्रमुखांनी या प्रभागांवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.
खरोसा ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर वाढला आहे. गावात एकूण ५ प्रभाग आहेत. यातील प्रभाग २,३ आणि ४ येथील जागा मागास महिला- पुरुष, इतर मागास महिला- पुरुष आणि सर्वसाधारण महिला आणि पुरुषासाठी आरक्षित आहे. दरम्यान, या तीन प्रभागातील उमेदवार सरपंच पदाचा दावेदार ठरु शकतो, असे गणित घालत पॅनल प्रमुखांनी या प्रभागांवर प्रचाराचा अधिक भर दिला आहे.
गावातील निवडणुकीत एका अपक्षासह दोन पॅनल आहेत. १९८८ पासूनचा इतिहास पहिला असता आजपर्यंत एकदाही अपक्षाला विजयश्री खेचून आणता आली नाही. गावातील एकूण पाच प्रभागात महिला १ हजार ९६२ आणि पुरुष २ हजार ३४८ मतदार आहेत. प्रत्येक उमेदवार आणि पॅनल प्रमुख मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.