लातूर : लातूरनजीकच्या हरंगुळ बु. येथील रेल्वे स्थानकावर परळी- मिरज रेल्वे थांबत होती. त्यामुळे प्रवाशांसह वारकऱ्यांची सोय होत होती. परंतु, कोविडच्या कालावधीपासून येथील रेल्वे थांबा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील पाच गावांतील प्रवाशांची गैरसोय होत आहे. दरम्यान, येथे पूर्ववत थांबा देण्यात यावा, असा ठराव तीन ग्रामपंचायतीने घेतला आहे.
लातूरनजीकच्या हरंगुळ बु. येथे रेल्व स्टेशन आहे. या ठिकाणी परळी- मिरज पॅसेंजर गाडीला थांबा होता. त्यामुळे हरंगुळ बु. सह पाखरसांगवी, खंडापूर, चिंचोलीराव, शामनगर, चिंचोलीराववाडी, साखरा आदी गावांतील प्रवाशांसह वारकऱ्यांची सोय होत होती. कमी दरात आणि जवळच्या ठिकाणाहून रेल्वे सेवा मिळत असल्याने समाधान व्यक्त होत होते. विशेष म्हणजे, या भागातील प्रवाशी संख्याही चांगली होती.
कोविडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर परळी- मिरज रेल्वे गाडीचा थांबा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. येथील स्थानकात परळी- मिरज रेल्वेला जाताना आणि येताना थांबा देण्यात यावा, अशी मागणी करीत हरंगुळ बु., शामनगर आणि पाखरसांगवी ग्रामपंचायतीने ठराव घेतला आहे. हा ठराव आणि मागणीचे निवेदन मध्य रेल्वेचे विभागीय प्रबंधक शैलेश गुप्ता, खा. सुधाकर शृंगारे यांना देण्यात आले आहे. तसेच माजी पंचायत समिती सदस्य, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनीही साकडे घातले आहे. यावेळी सरपंच सूर्यकांत सुडे, सरपंच सुरेखा बनसोडे, कोमल इर्लेवाड, माजी पंचायत समिती सदस्य अरविंद सुरकुटे, विठ्ठल शेंडगे, चंद्रकांत खटके, राजकुमार गुरमे, भगवान भालेराव, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शामसुंदर मानधना आदी उपस्थित होते