निलंगा (जि. लातूर) : शहरातील बहुतांश व्यापारी कॅरिबॅगचा वापर करीत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने गुरुवारी दुकानांची तपासणी केली. तेव्हा सात दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळले. त्यामुळे पालिकेने दंड आकारत कारवाई केली आहे. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शहरातील काही दुकाने, बार, रेस्टॉरंटमध्ये साहित्य, पार्सल देण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे. कॅरिबॅगचा वापर बंद व्हावा म्हणून पालिका प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात येऊन आता धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. गुरुवारी पालिकेच्या दोन पथकांनी दुकानांची पाहणी केली. तेव्हा सात ठिकाणी कॅरिबॅगचा वापर होत असल्याचे आढळले. त्यामुळे पथकाने दंडात्मक कारवाई करीत प्रत्येकी पाच हजारांप्रमाणे एकूण ३५ हजारांचा दंड वसूल केला आहे.
दरम्यान, एका किराणा दुकानदाराने दंडाची रक्कम भरण्यास नकार दिल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी त्यांच्या दुकानातील वजनकाटा जप्त केला आहे. व्यापाऱ्यांनी यापुढे कॅरिबॅगची साठवणूक व वापर करू नये, असा समज देण्यात आला आहे. या पथकात पालिकेचे सहाय्यक अभियंता कैलास वारद, जी.के. देवकते, कार्यालय अधीक्षक विठ्ठल भंडे, अभियंता लोणारे, अभंग गायकवाड, अजय दळवी, मुस्सा मुबारक, विठ्ठल कौडगावे, इंद्रजित जाधव, प्रेमनाथ गायकवाड, संदीप निटुरे, दत्ता सुरवसे, रमेश कांबळे, महादेव कांबळे, प्रकाश गायकवाड आदी सहभागी झाले होते.
मराठवाडामुक्ती संग्राम दिनापर्यंत निलंगा शहर प्लास्टिकमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे शहरातील नागरिक, व्यापाऱ्यांनी प्लास्टिकचा वापर करू नये. दुकानदारांनी कॅरिबॅगचा वापर करीत असल्याचे आढळल्यास पुढील काळात अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी घन:शाम अडसूळ यांनी सांगितले.