लातूर : जिल्ह्यातील १६१ महाविद्यालयांना समाज कल्याण विभागाने नोटीसा पाठविल्या असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित राहिल्यास समाज कल्याण कार्यालय त्याला जबाबदार राहणार नाही, असे या नोटिसीत म्हटले आहे. दरम्यान जिल्ह्यातील १६१ महाविद्यालयाचे ४३४-शिष्यवृत्तीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. अशाच महाविद्यालयांना समाज कल्याण विभागाने नोटीसा पाठवून २४ ऑगस्टच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या वतीने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते.त्यासाठी पीएफएम पोर्टल केंद्र सरकारने सुरू केले आहे.या पोर्टलवर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रस्ताव महाविद्यालयामार्फत ऑनलाईन सादर केले जातात. परंतु जिल्ह्यातील १६१ महाविद्यालयांनी अनेक विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शिष्यवृत्तीसाठी सादर केलेले नाहीत. जवळपास ४३४ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव महाविद्यालय स्तरावरच प्रलंबित आहेत. २४ ऑगस्टच्या आत सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयाच्या लॉगिनवर शिष्यवृत्ती प्रस्ताव सादर नाही केल्यास संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही.त्याला महाविद्यालय आणि विद्यार्थी जबाबदार राहतील, असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त एस एन चिकुर्ते यांनी या नोटीसित म्हटले आहे.