औसा (लातूर ) : सव्वा महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीपातील सोयाबीन, मुग, उडीद पिकांचा पाचोळा झाला आहे़ त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़ शासन मात्र नुकसानीचे पंचनामे करीत नाही़ त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारास करपलेल्या पिकांच्या पेंड्यांचे तोरण बांधून अनोखे आंदोलन करण्यात आले़
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष शिवकुमार नागराळे, मुकेश देशमाने, महेश बनसोडे, राजेंद्र कांबळे, धनराज गिरी, किरण बिराजदार, शैलेश इरपे, गोविंद चव्हाण, सतीश जंगाले, युवराज आळणे, विकास लांडगे, अनिल बिराजदार, संदीप कांबळे, दशरथ ठाकूर, शंकर शिंदे, विजय भोसले, प्रवीण पोतदार, शाम शिंदे, समाधान शिंदे, शंकर शिंदे, विशाल करदुरे, गुणवंत लोहार, काशिनाथ आळणे, कपिल पवार, विवेक महावरकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
औसा तालुक्यात अल्प पावसावर खरीप पिके जगली़ परंतु, गेल्या सव्वा महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे़ त्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला आहे़ त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत़ अशा परिस्थितीत शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात करणे गरजेचे होते़ परंतु, अद्यापही पंचनामे सुरु झाले नाहीत़ त्यामुळे मनसेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले़ शासनाने शेतकºयांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करुन आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे़