उदगीर (जि. लातूर) : उदगीर पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत धनादेश अदा करण्यासाठी लेखापालाने टक्केवारी मागितल्याची तक्रार मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यावरून नगरपरिषद प्रशासन संचालक तथा आयुक्तांनी येथील पालिकेतील लेखापाल नीलेश ओमप्रकाश यशवंतकर यांना गुरुवारी निलंबित केल्याचे आदेश काढले आहेत.
उदगीर पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे दोन कोटी निवृत्तीवेतन थकीत होते. त्यांचे धनादेश अदा करण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी स्वाक्षरित केलेले धनादेश देण्याचे लेखापाल नीलेश ओमप्रकाश यशवंतकर यांना सांगितले होते. त्यांनी टक्केवारी मागितल्याची तक्रार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली होती. त्यामुळे प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली असता १० कर्मचाऱ्यांचे धनादेश अदा करण्यासाठी एकूण ४ लाख ५३ हजार ५०० रुपये लिपिकास दिल्याचे त्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी साक्षीदारांसमोर सांगितले. तेव्हा लेखापाल यशवंतकर यांच्यावर कारवाई करण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी, नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडे सादर करण्यात आला होता. दरम्यान, लेखापालाने त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना धमक्या देत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्याने बुधवारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी लेखापाल यशवंतकर यांची पुढील आदेश येईपर्यंत रेणापूर येथे बदली केली होती.
तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या प्रस्तावानुसार गुरुवारी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक तथा आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांनी उदगीर पालिकेतील लेखापाल नीलेश यशवंतकर यांना निलंबित केल्याचे आदेश काढले आहेत. निलंबन कालावधीत त्यांनी लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपरिषद प्रशासन शाखेत उपस्थित राहावे. जिल्हा सहआयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट केले आहे.