उदगीर (जि. लातूर) : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा उदगीरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. सुभेदार यांनी सुनावली आहे.
पिडीत मुलीची व आरोपी प्रमोद भांगे यांची महाविद्यालयात असताना ओळख झाली होती. त्या ओळखीतून आरोपीने मुलीला तुझ्यासोबत लग्न करतो असे म्हणत सन २०१३ ते २०१५ या कालावधीत वारंवार बलात्कार केला. तद्नंतर पिडितेला न कळू देता आरोपीने २८ मे २०१५ रोजी दुसऱ्या मुलीशी लग्न केले. याप्रकरणी पिडितेने उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन आरोपीविरुध्द कलम ३७६ (२) (एन) भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तपास महिला पोलिस उपनिरीक्षक एस.डी. जाधव यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
येथील अति. जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या साक्षीदारांच्या साक्षी पुराव्यांवर व कागदपत्रावर तसेच सहा. सरकारी वकील शिवकुमार गिरवलकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.डी. सुभेदार यांनी आरोपी प्रमोद भांगे यास १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील म्हणून ॲड. शिवकुमार गिरवलकर यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी पोहेकॉ. अक्रम शेख यांनी सहकार्य केले.