वृक्ष लागवड, संवर्धनासाठी पुढाकार घ्या : महापौर
लातूर : लातूर शहर व परिसरात वृक्ष लागवड व संवर्धनाच्या कामाला अधिक गती देऊन हरित शहर करण्यासाठी निश्चित दिशा ठरवून एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले. मनपा मुख्यालयात सोमवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त अमन मित्तल, नगरसेवक रविशंकर जाधव उपस्थित होते. यावेळी महापौर गोजमगुंडे म्हणाले, स्वच्छ शहर, सुंदर शहर व हरित शहर करण्यासाठी मनपा काम करीत आहे. त्या दृष्टिकोनातून मनपाच्या वतीने वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे काम केले जात आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून याच पद्धतीने सर्वेात्कृष्ट कार्य सुरू आहे. महानगरपालिका आणि संस्थांचे उद्दिष्ट एकच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सहभाग वाढवून हरित उपक्रमाला गती द्यावी, असे आवाहनही महापौरांनी केले. बैठकीला इम्रान सय्यद, सचिन मस्के, उपायुक्त मयुरा शिंदेकर, लातूर वृक्षचे सुपर्ण जगताप, प्रमोद निपाणीकर, मनमोहन डागा, प्रा. योगेश शर्मा, ॲड. अजित चिखलीकर, ॲड. सर्फराज पठाण, ऋषिकेश दरेकर आदी उपस्थित होते.