अहमदपूर : शहरातील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर बहुउद्देशीय इनडोअर स्टेडियम १० वर्षांपासून प्रलंबित आहे. मार्चअखेरपर्यंत पूर्ण न झाल्यास विद्यापीठ अनुदान आयोगाचे ३५ लाख रुपये सव्याज परत करावे लागणार आहेत. त्यामुळे क्रीडाप्रेमींतून सदरील मैदान पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
शहरातील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर क्रीडा संकुल व इनडोअर स्टेडियमच्या उभारणीस सन २०१२ मध्ये सुरुवात झाली. त्यासाठी २ कोटींच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र, २०१३ मध्ये एका वर्षात १ कोटी २३ लाख रुपये खर्च केल्यानंतर निधीअभावी व काही तांत्रिक अडचणीमुळे १० वर्षांपासून सदरील स्टेडियमचे बांधकाम थांबले आहे. त्यामुळे खेळाडूंना सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे.
सदरील स्टेडियम महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर असून त्यात बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, नेटबॉल, कबड्डी, टेबलटेनिस, खो-खो, जुडो, कुस्ती, योगा, मल्लखांब अशा विविध प्रकारच्या खेळासाठी एक क्रीडांगण उपलब्ध होणार असून त्यात एक हजार प्रेक्षक बसतील एवढी क्षमता आहे. तसेच खेळाडूंसाठी १६ खोल्यांची व्यवस्था असून प्रेक्षकांसाठी गॅलरीची व्यवस्था केली आहे. हे इनडोअर स्टेडियम सर्व सुविधांनीयुक्त असून तिथे विद्युत प्रकाशझोतात दिवस-रात्र सामने होऊ शकतात. विविध खेळासंबंधी वुडन फ्लोरिंग बैठक हॉल, खाेल्या, पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहेत.
दरम्यान, मागील अंदाजपत्रके २ काेटींची होती. त्यातील १ कोटी ३२ लाख खर्च झाले होते. मात्र, काम प्रलंबित राहिल्यामुळे नवीन अंदाजपत्रक आणखीन १ कोटी २१ लाखांचे झाले. त्यामुळे स्टेडियमचा एकूण खर्च २ कोटींवरुन २ कोटी ५३ लाख रुपये झाला आहे. त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ३५ लाखांचा निधी खर्च केला असून उर्वरित निधी व्यवस्थापनाने खर्च केला आहे. मात्र, बांधकाम थांबल्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने सदरील बांधकाम मार्चअखेर न झाल्यास त्यांनी दिलेले ३५ लाख सव्याज परत करण्यासंबंधी सूचना केली आहे. तसेच उर्वरित ३५ लाखांचे अनुदानही मिळणार नाही. त्यामुळे खेळाडूंना एका मोठ्या स्टेडियमला मुकावे लागणार आहे.
मार्चपर्यंत काम पूर्ण...
मार्चअखेरपर्यंत स्टेडियम खेळाडूंना उपलब्धतेसंबंधी व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे. उर्वरित काम मार्चपर्यंत पूर्ण करून स्टेडियम खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे विचार विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड. किशनराव बेंडकुळे यांनी सांगितले.
खेळाडूंची सोय होणार...
ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी विचार विकास मंडळाने व विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व सोयींनी सज्ज असलेले इनडोअर स्टेडियम तयार करीत आहे. लवकरच ते कार्यान्वित होईल. त्यामुळे खेळाडू व प्रशिक्षणाची सोय होणार असल्याचे क्रीडा संचालक प्रा.डॉ. मनोज रेड्डी यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे कालावधी वाढला...
स्टेडियमचे २५ टक्के काम शिल्लक राहिले असून केवळ विद्युत जोडणी व वुडन फ्लोरिंग झाल्यानंतर लगेच स्टेडियम खेळण्यासाठी उपलब्ध होणार आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये काम बंद असल्यामुळे सदरील काम प्रलंबित आहे, असे महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य खिल्लारे यांनी सांगितले.
***