लातूर : राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे लातूर शहरालगत अनेक भागातील मनपाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी दुर्गंधीयुक्त पाणी जमा होत आहे. पावसाचे पाणी निघत नसल्याने दुर्गंधी वाढली. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर मनपाने या पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे बोट दाखवले आहे. त्यांना पत्र देण्यात आले असून पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.
पीव्हीआर चौक ते औसा रोड हा रस्ता करीत असताना शहरातून बाहेर जाणाऱ्या नाल्यास बॉक्स कल्वर्ट बांधणे आवश्यक होते, परंतू तसे झाले नाही. आपल्या रेन वॉटरचा बेड लेवलसुध्दा उंच झाला आहे. त्यामुळे शहरातील रोडलगत पाणी साचून घाण पाण्याचे तळे साचत आहेत. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. साचलेले घाण पाणी वाहून नेण्यासाठी आपण त्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, असे महामार्ग विभागाला देण्यात आलेल्या पत्रात मनपाचे शहर अभियंता नवनाथ केंद्रे यांनी नमूद केले आहे.
विराट नगरात शिरते पाणी...खाडगाव रिंगरोडलगत रामरहिम नगर, विराट नगर भागात जवळपास तीन एकरावर जागेत दुर्गंधीयुक्त पाण्याचे तळे साचले आहे. पाऊस झाला की विराट नगर येथील जवळपास पाच ते सहा जणांच्या घरात पाणी शिरते. शिवाय, खाडगाव स्मशानभूमीसमोर मुख्य रस्त्याने पाणी वाहते. पाणी निचरा होण्यासाठी मार्गच नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
रस्ता कामात नळ्या टाकणे चुकले...राष्ट्रीय महामार्गाचे काम करीत असताना पाण्याचा निचरा करण्यासाठी नळ्या टाकण्यात आल्या आहेत. नळ्या न टाकता बॉक्स कल्वर्ट पध्दतीचे पूल बांधले असते तर सहजपणे पाणी निचरा झाला असता. बेडची उंची वाढल्याने पाणी जात नाही, आता या चुका सुधारणे गरजेचे असले तरी पुढाकार घ्यायचा कोण, असा प्रश्न आहे. मनपा, महामार्गविभागाकडे बोट दाखवत आहे.
नागरिकांच्या जिवाशी खेळ...मनपा, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या खेळात नागरिकांच्या आरोग्याशी प्रशासन खेळत आहे. बारमाही पाणी थांबलेले असतानाही कोणी दखल घेत नाही. शहर अभियंता नवनाथ केंद्रे यांनी महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठविले. या पत्राची महामार्ग विभाग कधी दखल घेणार असा प्रश्न आहे. सध्या तरी या भागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे.