निलंगा (जि. लातूर) : विवाह सोहळ्यातील भोजनातून २०० वऱ्हाडी मंडळींना मळमळ, पोटदुखी, उलटी, जुलाबाचा त्रास झाला. त्यामुळे त्यांच्यावर अंबुलगा बु., वलांडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येऊन घरी सोडण्यात आले. ही घटना रविवारी रात्री घडली आहे.
निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथील एका मुलीचा विवाह देवणी तालुक्यातील जवळगा साकोळ येथील मुलाशी रविवारी दुपारी १२.३० वाजता केदारपूर येथे पार पडला. विवाह झाल्यानंतर वऱ्हाडी मंडळींनी जेवण केले. त्यानंतर सर्व वऱ्हाडी मंडळी आपल्या गावी निघून गेली. दरम्यान, रात्री ८ ते ९ वा. पासून भोजन केलेल्या वऱ्हाडी मंडळींना मळमळ होणे, पोट दुखणे, जुलाब, उलट्या असा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना नजीकच्या वलांडी, अंबुलगा बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच काटेजवळगा, जवळगा उपकेंद्रात तर काहींवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. जवळपास २०० जणांवर उपचार करण्यात आले.
जवळग्याचे येथील सरपंच हनुमंत बिराजदार यांनी वलांडी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या पथकास बोलावून १०७ जणांवर उपचार करुन घेतले. त्यासाठी अंगणवाडी सेविकांचीही मदत घेण्यात आली. अंबुलगा बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र माकणे म्हणाले, आतापर्यंत ७० रूग्णांवर उपचार केले आहेत. त्यांच्या उलटीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या रुग्णांच्या पोटात दुखणे, उलटी, जुलाब असा त्रास होता. सर्वांची प्रकृती चांगली असल्याने घरी पाठविण्यात आले आहे. तसेच सोमवारी सकाळी नवीन आणखी १० असे रूग्ण आले होते, असेही ते म्हणाले.