चाकूर : तालुक्यातील नळेगाव येथील एका गणेश मंडळासमोर तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या १५ जणांवर पोलिसांनी मंगळवारी रात्री कारवाई करीत २ लाख १० हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सहाय्यक पोलीस अधिक्षक निकेतन कदम व पोलीस निरीक्षक बालाजी माेहीते यांच्या मार्गदर्शनाखाली चाकूर पोलिसांची अवैध धंद्यावर कारवाई सुरु आहे. दरम्यान, नळेगाव येथील एका गणेश मंडळासमोर जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने मंगळवारी मध्यरात्री धाड टाकली. यावेळी पंधरा जण स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन पत्त्यावर जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आले. त्यांच्या कडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण २ लाख १०हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पंधरा जणाविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पथकात पोलीस उपनिरीक्षक तुकाराम फड, कपील पाटील, पोलिस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, दिलीप मोरे, पोहेकॉ योगेश मरपल्ले, हणमंत मस्के यांचा समावेश आहे.