लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या कारवाईत कर्णकर्कश, फटाका सायलन्सर माेठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले हाेते. दरम्यान, या सायलन्सरवर लातुरात शनिवारी पाेलिसांनी ‘राेलर’ फिरवला. यातून पाेलिसांनी फटाका सायलन्सर वापरणाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे.
लातूर शहरात दुचाकींना माॅडिफाय केलेले सायलन्सर लावून आवाज करत फिरणारे दुचाकीस्वार नियमांचे उल्लंघन करत रुग्णालय, शाळा, महाविद्याल, ट्युशन एरियासह इतर शांत ठिकाणी ध्वनी प्रदूषण करत फिरताना आढळून येत आहेत. परिणामी, रुग्णांना, स्थानिक नागरिकांना, विद्यार्थ्यांना माेठ्या प्रमाणावर त्रास हाेत आहे. याला आवरण्यासाठी लातूर जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी कारवाईचे आदेश दिले हाेते. त्यानुसार पाेलिसांनी वेळाेवेळी कारवाईचा बडगा उगारला असून, यापूर्वी एका वर्षात तीनवेळा माॅडिफाय केलेले फटका सायलन्सर काढून, दुचाकी चालकांना दंडही केला आहे. जप्त केलेल्या सायलन्सरवर पाेलिसांनी राेलर फिरवला. नाेव्हेबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत कर्णकर्कश सायलन्सर वापरणाऱ्यांविराेधात माेठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून, जवळपास १७० माॅडिफाय केलेले, फटका सायलन्सर जप्त केले आहेत.
जप्त केलेल्या सायलन्सरचा पुनर्वापर हाेणार नाही, यासाठी पंचनामा करुन ते नष्ट करण्याचा निर्णय पाेलिसांनी घेतला. लातूर शहर वाहतूक शाखेने १७० सायलन्सर शनिवारी राेलर फिरवला. यासाठी अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाे.नि. गणेश कदम यांनी पुढाकार घेतला.
वर्षात ५७० सालन्सरचा पाेलिसांनी केला चुराडा...जानेवारी २०२३ ते जानेवारी २०२४ या काळात लातूर पाेलिसांकडून तब्बल ५७० दुचाकीमालकांवर, चालकांवर मफलर, फटाका, माॅडिफाय केलेले कर्णकर्कश सायलन्सरप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या सायलन्सरवर पाेलिसांनी वर्षभरात चारवेळा राेलर फिरवला आहे. - साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक, लातूर