राजकुमार जाेंधळे, लातूर : माेबाइल चाेरणाऱ्या टाेळीतील पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण ४ लाख २१ हजारांचे ३४ माेबाइल जप्त करण्यात आले आहेत.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील गांधी चौक ठाण्याच्या हद्दीत मोबाइल चोरल्याची घटना घडली. दरम्यान, फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय, इतर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतही या टाेळीने माेबाइलची चाेरी केल्याने स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले हाेते. गुन्ह्यांचा उलगडा करण्याचे आदेश पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने या गुन्ह्यांबाबत बारकाईने तपास केला अन् टाेळीला पकडण्यात यश आले.
खबऱ्याच्या माहितीने लागला गुन्ह्याचा छडा...
खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीसह तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून टाेळीचा शोध घेण्यात आला. खबऱ्याने स्थागुशाच्या पथकाला मोबाइल चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती दिली. या माहितीच्या आधारे मोबाइल चोरी करून ते मोबाइल कमी किमतीत लोकांना विक्री करणाऱ्या आरोपींची टोळी निष्पन्न झाली. विवेकानंद चाैक ठाण्याच्या रेकाॅर्डवरील मोबाइल चोरीचा गुन्हा उघड झाला असून, अधिक चाैकशीअंती इतर गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
राहत्या ठिकाणाहून पाच जणांना उचलले...
माेबाइल चाेरणाऱ्या टोळीतील पाच आराेपींना त्यांच्या राहत्या ठिकाणाहून उचलण्यात आले आहे. त्यांची झाडाझडती घेत चाैकशी केली असता, त्यांनी आपली नावे आसिफ सत्तार सय्यद (२४), जब्बार सत्तार सय्यद (२८), बाबा सतार सय्यद, (२१, सर्व रा. लालबहादूर शास्त्रीनगर, लातूर), मुस्तफा सतारमिया शेख (२९, रा. बरकतनगर, लातूर, हमु. करीमनगर, गरुड चौक, लातूर) आणि मोहम्मद रिजवानूल हक अब्दुल रजाक गवंडी (३०, रा. दत्तनगर, निलंगा) अशी सांगितली. अटकेतील आराेपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून विविध कंपनीचे ३४ मोबाइल असा ४ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
या विशेष पथकाने केली कारवाई...
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, राहुल सोनकांबळे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, नितीन कठारे, राहुल कांबळे, मनोज खोसे, प्रदीप चोपणे, सायबर सेलचे सपोनि. नलिनी गावडे, संतोष देवडे, शैलेश सुडे यांच्या पथकाने केली.