लातूर : शहरातील विविध मार्गावर सुसाट धावणाऱ्या, सीटबेल्टचा वापर न करणाऱ्या त्याचबराेबर वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघटन करणाऱ्या वाहनधारकांवर पाेलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यासाठी लातुरात सोमवारपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसामध्ये करण्यात आलेल्या वाहनतपासणीत एकूण ३९८ वाहनधारकांनी नियम माेडल्याचे समाेर आले आहे. त्यांना एकूण ८० हजारांचा दंड करण्यात आला आहे.
लातूर शहरात दिवसभर बार्शी राेड, औसा राेड, अंबाजाेगाई राेड आणि नांदेड रोड, रिंगरोड परिसरात वाहन तपासणी मोहीम हाती घेण्यात येत आहे. अलीकडे रस्ते अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असल्याने, यातील मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. रस्त्यावरील अपघातात सर्वाधिक जीवितहानी ही केवळ सीटबेल्ट न वापरल्याने झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. आता हे अपघातात टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी सोमवारपासून 'सीटबेल्ट प्रबोधन मोहीम' हाती घेतली आहे.