रेणापूर : पैसे कमाविण्याच्या हेतूने रेणापूर पिंपळफाटा येथे अवैधरित्या गुडगुडी नावाचा खेळ सुरु असताना पोलिसांनी धाड टाकून रोख रकमेसह संगणक, सीपीयू, मोबाईल व दोन दुचाकी असा एकूण १ लाख ५८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल मंगळवारी जप्त केला आहे. याप्रकरणी रेणापूर पोलिसांत चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेणापूर पोलिसांनी सांगितले, लातूरकडे जाणाऱ्या एका दुकानात पैसे लावून अवैधरित्या गुडगुडी नावाचा खेळ सुरु असल्याची गुप्त माहिती मंगळवारी दुपारी सुमारास पोलिसांना मिळाली. त्यावरुन रेणापूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक शिंदे, सपोनि. क्रांती निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनि बाळासाहेब कन्हेरे, पोलिस शिपाई परमेश्वर अंकुलगे व अन्य कर्मचाऱ्यांनी रेणापूर- पिंपळफाटा येथील दुकानवर धाड टाकली. तेव्हा पैसे लावून अनाधिकृतरित्या गुडगुडी नावाचा खेळ सुरु असल्याचे पहावयास मिळाले.
दरम्यान, पोलिस येत असल्याची कुणकुण लागल्याने काही जण पसार झाले. पोलिसांनी धाड टाकून राेख ४ हजार ३०० रुपये तसेच एलईडी, इंटरनेट कीट, तीन मोबाईल, टेबल- खुर्ची, दोन दुचाकी असा एकूण १ लाख ५८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस कर्मचारी परमेश्वर अंकुलगे यांच्या फिर्यादीवरुन रेणापूर पोलिसांत दुकान मालक नवनाथ चव्हाण, परमेश्वर चव्हाण (रा. रुपचंद नगर), कृष्णा राठोड (कोळगाव तांडा) व मिठाराम चव्हाण या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.