लातूर : लातूर शहर व परिसरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. दुचाकी चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शहर पोलीस उपाधीक्षक जितेंद्र जगदाळे यांच्या पथकाने स्क्रॅप मार्केट भागात दोघांना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या चार मोटारसायकली जप्त केल्या. अटक करण्यात आलेले दोघे सख्खे भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन, शहर पोलीस उपाधीक्षक जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. पथकातील सहायक फौजदार वाहिद शेख, रामचंद्र ढगे, पोलीस नाईक महेश पारडे, पो.हे.कॉ. दामोदर मुळे यांच्या पथकाने स्क्रॅप मार्केटमध्ये वेगवेगळ्या मोटारसायकलवर आलेल्या दोघांना ताब्यात घेतले.
करिमपाशा अमनजी शेख (रा. तुंगी, ता. औसा, जि. लातूर) तसेच गणीपाशा अमनजी शेख अशी त्यांची नावे असून, हे दोघे सख्खे भाऊ आहेत. त्यांनी शहरातून चोरलेल्या दुचाकींची कबुली दिली. अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे पाच दुचाकी आढळून आल्या. त्यापैकी चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जवळपास १ लाख ५० हजार रुपयांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.