राजकुमार जाेंधळे, लातूर : बाभळगाव येथील पाेलिस मुख्यालयात नियुक्तीवर व सध्या आजारपणाच्या रजेवर असलेले सुरेश बाबुराव उस्तुरगे (वय ५४) यांनी लातुरातील राहत्या घरी छताच्या फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना साेमवारी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद झाली आहे.
लातुरातील एमआयडीसी ठाण्याचे पाेलिस निरीक्षक गाेरख दिवे म्हणाले, मयत सुरेश उस्तुरगे हे पूर्वी रेणापूर पाेलिस ठाण्यात कार्यरत हाेते. काही महिन्यांपूर्वी त्यांची बाभळगाव येथील पाेलिस मुख्यालयात बदली झाली हाेती. ते लातूर शहरातील नांदगाव राेड भागात सध्या वास्तव्याला हाेते. मूळचे शिरुर अनंतपाळ येथील रहिवासी असून, त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दाेन मुली, एक जावई असा परिवार आहे.
पत्नी, मुलीचे प्रयत्न...
उस्तुरगे हे ५ सप्टेंबरपासून आजारपणाच्या रजेवर हाेते. साेमवारी ज्या खाेलीमध्ये त्यांनी गळफास घेतला त्या खाेलीचा दरवाजा उघडाच हाेता. घरात पत्नी आणि मुलगी हाेती. गळफास घेतल्याचे पत्नीला आढळून आले. त्यांनी उस्तुरगे यांना वाचविण्यासाठी धडपड केली. पत्नी व मुलीने सुरेश उस्तुरगे यांना नजीकच्या एमआयटी रुग्णालयात नेले. तेथून पुढे शासकीय सर्वाेपचार रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांची प्राणज्याेत मालवली.