लातूर : शहरासह उदगिरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांच्या पथकाने छापा मारला. यावेळी सात जणांना अटक करण्यात आली असून, ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाणे आणि लातुरातील एमआयडीसी पाेलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरात खाडगाव राेड परिसरातील राम-रहिम नगर येथे स्वत:च्या फायद्यासाठी काही महिला-पुरुषांनी कुंटणखाना सुरू केला आहे, अशी माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी लातुरात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. लातुरातील राम-रहिम नगर येथे काही महिला, पुरुष स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरून स्त्रियांना बोलावून घेत त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत आहेत.
या माहितीची खातरजमा केल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष (एएचटीयू) पथक, पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने बनावट ग्राहक पाठवून कुंटणखान्यावर छापा मारला. यावेळी देहविक्रय करताना लातुरात सहा पीडित महिला, हा व्यवसाय करून घेणाऱ्या महिला आणि पुरुष पाेलिसांच्या जाळ्यात अडकले. पाेलिसांनी कुंटणखाना चालणाऱ्या महिला आणि पुरुषाला अटक केली आहे.
याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीवरून अनैतिक व्यवसाय प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.