लातूर शहरातील नवीन रेणापूर नाका ते गरूड चाैक नांदेड नाका या रस्त्याची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. अरुंद आणि जीवघेण्या पुलावरून सध्याला वाहतूक सुरू आहे. पावसाचे पाणी या पुलावरून वाहत आहे, अशातून वाहनधारक वाट काढत प्रवास करत आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी गत अनेक दिवसांपासून हाेत आहे. मात्र, याकडे संबंधितांचे दुर्लक्ष हाेत आहे, असा आराेप त्रस्त झालेल्या नागरिकांतून हाेत आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांच्या खाेलीचा अंदाज येत नाही. यातून अपघाताच्या घटना घडत आहेत, तर वाहनांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान हाेत आहे. रस्त्याबाबत नागरिकांनी ओरड केली की, थातूरमातूर डागडुजी केली जात आहे. नवीन रेणापूर नाका ते नवीन नांदेड नाका बाह्यवळण रस्ता आता चिखलाचा रस्ता बनला आहे. शेकडाेंच्या संख्येत असलेले खड्डे आणि चिखलातून वाहनधारकांना वाट काढत प्रवास करणे आता कठीण झाले आहे. या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह त्रस्त वाहनधारकांतून हाेत आहे.
रेणापूर नाका ते नांदेड नाका रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:14 AM