उड्डाणपुलावरील गवतामुळे वाहनधारक त्रस्त
लातूर : बार्शी रोडवर असलेल्या उड्डाणपुलावरील रस्त्याच्या कडेला गवत वाढले आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. या रस्त्यावरून दुचाकीसह अवजड वाहनांची रेलचेल असते. त्यातच गतिरोधक बसविण्यात आलेले नाहीत. या उड्डाणपुलावरील रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत काढण्यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. सध्या पावसाळा असल्याने तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे.
कव्हा येथे धूर फवारणी मोहीम
लातूर : तालुक्यातील कव्हा येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने डासोत्पत्ती रोखण्यासाठी धूर फवारणी मोहीम राबविली जात आहे. कव्हा येथील विविध वाॅर्ड तसेच शाळा, रुग्णालय परिसरात ही मोहीम सुरू आहे. या मोहिमेमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी सरपंच पद्मीन सोदले, उपसरपंच किशोर घार, विश्वंभर घार, संतोष सुलगुडले आदींसह ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्थित होते.