- सतीश बिरादार लातूर : गिर्यारोहक दिपक कोनाळे याने देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारोवर यशस्वी चढाई केली. बुधवारी (दि. ४ ) पहाटे त्याने हि कामगिरी केली. यावेळी त्याने शिखरावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवत राष्ट्रगीतही गायले.
किलीमांजरो हे शिखर अफ्रिकेतील टांझानिया देशात समुद्र सपाटी पासून 19,341फूट आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी 15 ऑगस्ट 2015 रोजी हे शिखर सर करून त्यावर भारताचे राष्ट्रगीत वाजवून विश्वविक्रम केला होता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयारी करत असलेले गिर्यारोहक दिपक कोनाळे हे शिखर सर करून इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. शून्याच्या खाली तापमान, घोंघावते वारे, उभी चढण या सर्वांमधून अतिशय काळजीपूर्वक त्याने ही मोहीम पूर्ण केली आहे. या शिखराच्या चढाईसाठी त्यांने २९ जून रोजी सुरवात केली होती.दिपक मुळचा लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील सिंधीकामट येथील रहिवासी आहे. त्याने हि मोहीम एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे गिर्यारोहक बालाजी जाधव आणि निखिल यादव, सागर भारती यांनी स्थापन केलेल्या 360 एक्सप्लोरर ग्रुपद्वारे यशस्वी केली. येणाऱ्या काळात दिपक युरोप व ऑस्ट्रेलीया खंडातील सर्वोच्च शिखर सर करणार आहे. पुण्यातील जेष्ठ गिर्यारोहक सुरेंद्र शेळके यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.
ही माझ्यासाठी सर्वात महत्वाची मोहीम होती. शेवटच्या चढाईवेळी कमी तापमानात आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थतीत मी ही चढाई पूर्ण केली आहे. भारताचा सर्वात मोठा तिरंगा किलीमांजारो शिखरावर घेवुन गेलो जेव्हा मी राष्ट्रगीत म्हणत होतो त्यावेळी माझ्यासाठी खूप भावूक क्षण होता. युरोप व ऑस्ट्रेलीयामधील सर्वोच्च शिखर सर करावयाचे आहे.सुरेंद्र शेळके व 360 एक्सप्लोरर चे एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.
- दिपक कोनाळे दिपक यांनी जे यश संपादन केले आहे त्याचा सर्वाना अभिमान आहे. अतिशय प्रतिकूल वातावरणात त्यांनी जी चढाई केली आहे त्याला कशाची तोड नाही. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट गुरु सुरेंद्र शेळके सरांचे सततचे मार्गदर्शन यामुळे आम्ही ही मोहीम आखून यशस्वी करून दाखवली. 360 एक्स्प्लोरर च्या माध्यमातून अनेकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.- आनंद बनसोडे, गिर्यारोहक, 360 एक्स्प्लोरर