लातूर : शहरातील इंडियानगरात वास्तव्याला असलेल्या बाळू डाेंगरे याच्या खूनप्रकरणी फरार दाेघांपैकी डाॅ. प्रमाेद घुगे यास उत्तराखंड राज्यातील हरिद्वारमधून साेमवारी सकाळी अटक करण्यात आली. त्यास हरिद्वार न्यायालयात दुपारी हजर करण्यात आले. ही कारवाई शिवाजीनगर पाेलिस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील बसस्थानक क्रमांक - २ लगत असलेल्या आयकाॅन हाॅस्पिटलमधील कर्मचारी बाळू भारत डाेंगरे (३५, रा. लातूर) याचा ११ डिसेंबर २०२४ रोजी मारहाण करून खून करण्यात आला होता. दरम्यान, मयताच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात डॉ. प्रमोद घुगे, अनिकेत मुंडे या दाेघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच दाेघे पाेलिसांना गुंगारा देत फरार झाले. त्यांच्या अटकेसाठी विविध पाेलिस पथके तैनात करण्यात आली हाेती. मात्र, आराेपी वेगवेगळ्या ठिकाणावर वास्तव्य करीत हाेते. जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी आराेपींच्या अटकेचे आदेश देत तपासाबाबत सूचना केल्या. त्यानुसार अपर पाेलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी शिवाजीनगर पाेलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करून विविध राज्यांत पाठविण्यात आली हाेती.
उत्तराखंड राज्यात दडी; खबऱ्याने दिली माहिती...
खुनाच्या गुन्ह्यात फरार दाेन्ही आरोपींचा शाेध पाेलिसांकडून सुरू हाेता. दरम्यान, खबऱ्याने पाेलिसांना माहिती दिली. त्याआधारे फरार डॉ. प्रमोद घुगे हा उत्तराखंड राज्यातील हरिद्वारमध्ये दडी मारल्याचे समाेर आले. पाेलिस पथकांनी साेमवारी सकाळी हरिद्वारमध्ये सापळा लावून डाॅ. घुगे यास अटक केली.
हरिद्वार ते लातूर एक्स्प्रेस रेल्वे प्रवास...
हरिद्वारमध्ये दडी मारलेल्या डाॅ. प्रमाेद घुगे यास पाेलिसांनी साेमवारी सकाळी माेठ्या शिताफीने अटक करून, दुपारी हरिद्वार येथील न्यायालयात हजर केले. आता त्यास एक्स्प्रेस रेल्वेने लातुरात आणले जाणार आहे. यासाठी दाेन दिवसांचा कालावधी लागणार असून, लातुरात येताच पुढील कारवाई केली जाईल. - साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक, लातूर