लातूर: महापालिकेच्या सफाई विभागात तीनशेच्या आसपास कर्मचारी असले तरी या कर्मचाऱ्यांवर दैनंदिन कामाचा मोठा भार असल्यामुळे मान्सूनपूर्व कामे खोळंबलेली आहेत. त्यामुळे मनपाला खासगी गुत्तेदारामार्फत मान्सूनपूर्व कामे करून घ्यावी लागत आहेत. शिवाय, या कामी महत्त्वाची असणारी वाहने बंद पडलेली आहेत. त्या वाहनांवरच काम भागविण्याची वेळ मनपावर आली आहे.
मनपाच्या मालकीची एकूण ८३ वाहने आहेत. त्यातील ३३ वाहने बंद पडले आहेत. ४७ वाहने चालू आहेत. रिफिज टँकर चार आहेत. तर कटर मशीन गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. छोट्या जेसीबी सहा आहेत. या वाहनांवर आणि गुत्तेदरांकडील कामगारांवर मान्सून पूर्व कामे केली जात आहेत. लातूर शहरांमध्ये सकल भागात पावसाळ्यात पाणी साचणे नाल्या तुंबणे, घरात पाणी शिरणे, अशा घटना घडतात. या पार्श्वभूमीवर मान्सूनपूर्व कामे करून घेणे महत्त्वाचे आहेत. मोठ्या-मोठ्या नाल्यांमध्ये गाळ किंवा कचरा पडून पाणी अडते. त्यामुळे या नाल्या साफ करणे आवश्यक आहे. महानगरपालिकेने या कामाला प्रारंभ केला असला तरी मनपाचे कर्मचारी ते काम करत नाहीत. खासगी गुत्तेदारांमार्फत काम केले जाते. दैनंदिन कामकाजातून सफाई कामगारांना तिकडे ड्युटी दिली जात नाही, असे स्वच्छता विभागातून सांगण्यात आले.
लातूर शहरात या भागातील घरांनी पाणी शिरते...दरवर्षी शहरातील प्रभाग क्रमांक तीन, चार, पाच आणि लातूर शहरातील पूर्व भागातील सकल भागात वास्तव्य असणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरते. झोपडपट्ट्यांमध्ये पाणी पावसाचे पाणी शिरते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. रस्त्यावर पाणी साचले जाते. नाल्यात तुंबल्या जातात. यामुळे जनजीवन विस्कळीत होते. नागरिकांची पावसाळ्यात अशी गैरसोय होऊ नये म्हणून मान्सूनपूर्व कामे होणे गरजेचे आहे.