आशपाक पठाण, लातूर: श्रावण सुरू झाला की चाहूल लागते ती श्रींच्या आगमनाची. यावर्षी अधिक मासमुळे गणरायाचे आगमन एक महिना पुढे लोटले गेले. जवळपास एक महिन्यानंतर गणरायाचे आगमन होणार आहे. आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी भक्तांनी तयारी सुरू केली आहे. लातुरात ढोल, ताशा, लेझीम पथकांनी सरावाला सुरूवात केली आहे.
लातूर शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्री गणरायाचे आगमन असो की निरोप दोन्हीवेळा मंडळांकडून अत्यंत वाजत-गाजत मिरवणुका काढल्या जातात. शहरातील झिंगणअप्पा गल्ली येथील शिवतरुण गणेश मंडळाच्या शिवतरुण ढोल-ताशा पथकाचे वाद्यपूजन व सराव कार्यक्रमाची सुरूवात शुक्रवारी सायंकाळी झाली. माजी नगरसेवक शैलेश स्वामी, नागेशअप्पा कनडे, शाम पवार, शिवतरुण गणेश मंडळाचे अध्यक्ष अनंत मेंगशेट्टे, महेश कोळळे, अभिषेक पतंगे, बालाजी झिपरे यांच्या हस्ते वाद्यपूजन करण्यात आले. यावेळी जयभवानी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त, शिवतरुण गणेश मंडळाचे नूतन पदाधिकारी, शिवतरुण ढोल पथकातील सर्व वादक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरावाला झाली सुरूवात...
लातूर शहरात विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी महिनाभरापासून सरावाला सुरूवात केली आहे. ढोल-ताशा, लेझीम, झांज पथकातील सर्व वादक एकत्र येऊन सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत तयारी करू लागले आहेत. लातूरच्या गणेश मंडळांनी विविध देखाव्यांतून संस्कृतीचे दर्शन घडविले आहे. शहरात अनेक जुनी गणेश मंडळे आजही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून समाजाला काही तरी देण्याचा प्रयत्न करतात. अधिक मासमुळे लांबलेल्या गणरायाच्या आगमनाची आता भक्तांना आतुरता लागली आहे.