३२४ बाधित रुग्णांमध्ये लातूर ग्रामीण ६१, उदगीर ३१, निलंगा २७, औसा १७ आणि लातूर मनपाहद्दीत १८५ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. तर उर्वरित तालुके सध्यातरी कोरोनामुक्त आहेत. जिल्ह्यातील दहाही तालुक्यांमध्ये बाधित रुग्णांची संख्या होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सहा तालुक्यांत रुग्णसंख्या आढळलेली नाही. शिवाय, जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीटीचा रेटही कमी झाला आहे. रॅपिड अँटीजेन टेस्टचा सरासरी ४ च्या आसपास पाॅझिटिव्हीटी रेट आहे. तर प्रयोगशाळेतील चाचणीत आढळलेल्या रुग्णांचा २.५ ते ३ टक्के पाॅझिटिव्हिटी आहे. तर आतापर्यंत आढळलेल्या एकूण बाधित रुग्णांचा पाॅझिटिव्हिटी रेट ११.७ टक्के आहे. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात हा रेट २३ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. दरम्यान, रुग्ण दुप्पट दिवसांचा कालावधी ६९० दिवसांवर असून, बरे होण्याचे प्रमाण ९५.८० टक्के आहे.
२३.५ वरून ११.७ वर पाॅझिटिव्हिटी रेट
जिल्ह्यात कोरोनाने सप्टेंबर महिन्यात हाहाकार माजवला होता. तब्बल ९ हजार १८८ रुग्ण या महिन्यात आढळले होते. पाॅझिटिव्हिटी रेट २३.२५ वर पोहोचला होता. सद्य:स्थितीत रॅपिड आणि प्रयोगशाळेतील चाचणीतील पाॅझिटिव्हिटी रेट ४ च्या आसपास आहे. तर आतापर्यंत झालेल्या चाचण्यांतील बाधितांचे प्रमाण ११.७ टक्के आहे. हे प्रमाण २३.५ वरून ११.७ टक्क्यांवर आले आहे, ही बाब जिल्ह्याला दिलासा देणारी आहे.