देवणी/ उदगीर : देवणी येथील प्राचीन समृद्ध वारसा लाभलेल्या गावात विविध मंदिरे, शिल्प, गढी, वाडे आहेत. त्याचे सर्वेक्षण महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील इतिहास विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी करून येथील शिल्पांवर शोधनिबंध प्रकाशित केले, तसेच या शिल्पाचे जतन व्हावे म्हणून प्रा. डॉ. एस.आर. सोमवंशी व प्रा. डॉ. एम. जी. महाके यांनी ग्रामस्थांना पटवून सांगितले. दरम्यान, या गावातील युवती व महाविद्यालयाची इतिहास विभागातील विद्यार्थिनी माया शिवनखेडे हिच्या प्रयत्नातून लॉकडाऊन काळात येथील शिल्प एकत्र करण्यात आले.
ही माहिती समाजमाध्यमाद्वारे मुख्यमंत्री कार्यालयास मिळताच पुरातत्व विभागाला तत्काळ दखल घेणे भाग पडले. पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे आणि औरंगाबाद येथील सहायक पुरातत्व विभागाचे पथक यांच्या सौजन्याने देवणी गावात नष्ट होऊ पहाणारे सदरील शिल्पाचे एकत्रीकरण करून गुरुवारी हा ऐतिहासिक वारसा ग्रामस्थांच्या मदतीने जतन करण्यात आला. यावेळी पुरातत्व सहायक संचालक अजित खंदारे यांनी गावकऱ्यांना ऐतिहासिक वारसा जतनाचे महत्त्व सांगितले. या कामासाठी ग्रामस्थांनी मोठे योगदान दिले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव उदगीर, देवणी भागात दिवसागणिक वाढत असून, शासन नियमांचे पालन करीत या कामात आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अजित खंदारे व त्यांच्या सहकारी टीमने दिलेले योगदान महत्त्वाचे असल्याचे डॉ. महाके म्हणाल्या.
सदरील सर्वेक्षणामुळे देवणी येथील शिल्प योग्य जागी जतन करत पार्वतीचे एक भव्य शिल्प आणि इतरही शिल्पास योग्य जागी ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थिनी, पुरातत्व विभाग व देवणी ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे गावातील नामशेष होत चाललेला समृद्ध वारसा जतन झाला आहे.
देवणी येथील ऐतिहासिक गढीचे खोदकाम करताना पुरातन काळातील विष्णू देवताची भव्य मूर्ती मिळून आली आहे. या मूर्तीची या गढीच्या ठिकाणीच स्थापना करून देवणीकरांनी भव्य मंदिर बांधले आहे. हा ऐतिहासिक वारसा जतन व्हावा, यासाठी देवणीकर प्रयत्नशील आहेत.
ऐतिहासिक वास्तू, शिल्प जतन करावे...
ऐतिहासिक वास्तू, शिल्पांचे जतन करणे ही केवळ शासन, पुरातत्व विभागाची जबाबदारी नाही. आपला हा वारसा आपणही जपायला हवा. विखुरलेला वारसा म्हणून सदरील शिल्पाचे छायाचित्र, माहिती समाजमाध्यमांवर शेअर केली. त्याची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली व संबंधित विभागाला सांगितले. पुरातत्व विभागाच्या मदतीने आम्हाला हा ऐतिहासिक वारसा जतन करता आला, याचे समाधान आहे, असे उदयगिरीच्या इतिहास विभागातील प्रा. डाॅ. महादेवी महाके यांनी सांगितले.