- हरी मोकाशे ( लातूर )
यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने शेती उत्पादनात ७० टक्क्यांनी घट झाली आहे़ लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालाची आवक घसरली आहे़ त्यामुळे बाजार समितीतील उलाढाल मंदावली आहे. सोयाबीनच्या सर्वसाधारण दरात १२० रुपयांनी घट झाली आहे, तर बाजरीच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली आहे़लातूर बाजार समितीत गत आठवड्यात दैनंदिन आवक २३ हजार ८७ क्विंटलपर्यंत होत होती; परंतु सध्या ही आवक १९ हजार १३५ क्विंटल झाली आहे़ ३ हजार ९५२ क्विंटलने आवक घटली आहे़ यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे खरिपातील शेती उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे़ त्यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून आवक कमी झाली आहे़ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने वेळा अमावास्येला सर्वसाधारण महत्त्व आहे़ या सणासाठी बाजरीला सर्वाधिक मागणी असते़ सध्या सीमावर्ती भागातून बाजरीची अल्प प्रमाणात आवक होत आहे़ कमाल दर २ हजार, सर्वसाधारण भाव १८०० रुपये मिळत आहे़ गत आठवड्याच्या तुलनेत सध्या साधारण दरात १८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे़
नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्याने बाजार समितीत आवक कमी होत आहे़ सध्या दररोज १३ हजार ६२६ क्विंटल आवक होत आहे़ कमाल दर ३ हजार ३९३ रुपये असून तो शासनाच्या आधारभूत किमतीपेक्षा ९४ रुपये जास्त आहे; परंतु साधारण दरात १२० रुपयांनी घट झाली असून ३२०० रुपये असा दर मिळत आहे़ याशिवाय, अन्य शेतमालाचे दर स्थिर आहेत़ साळी- ८५०, गहू- २५००, हायब्रीड ज्वारी- १३५०, रबी ज्वारी २४००, पिवळी ज्वारी- ४३००, मका- १५५०, हरभरा- ४१५०, मूग- ५१००, तूर- ४६७०, उडीद- ४६३०, करडई- ४१५० तर तिळास ११ हजार रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण भाव मिळत आहे़
शासनाच्या जाहीर केलेल्या आधारभूत किमतीच्या जवळपास खुल्या बाजारात सोयाबीनचे दर पोहोचल्याने नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर केवळ १२ शेतकऱ्यांचे ११३ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे़ याशिवाय, ४४३ शेतकऱ्यांच्या २१५८ क्विंटल उडिदाची, तर २७६९ शेतकऱ्यांच्या १३ हजार ४३३ क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली आहे़ दीड महिन्यात केवळ १५ हजार ७०४ क्विंटल सोयाबीन, उडीद आणि मुगाची खरेदी झाली आहे़ विलंबाने खरेदी केंद्र सुरू झाल्याने उडीद, मूग खरेदीवर परिणाम झाला आहे़ थोडेफार पैसे कमी मिळतील; परंतु पैशासाठी वारंवार हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही, म्हणून बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची खुल्या बाजारपेठेत विक्री केली आहे़ सध्या बाजारपेठेत दुय्यम दर्जाचा शेतमाल येत असल्याने दर स्थिर असल्याचे अडते, खरेदीदारांचे म्हणणे आहे़ एकंदरीत, यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत, तर बाजार समित्यांतील आर्थिक उलाढाल घटली आहे़ लातूर बाजार समितीत सध्या केवळ ५ ते ६ कोटी रुपयांपर्यंतचे व्यवहार होत आहेत़