- संदीप शिंदे
हरंगुळ खु. (लातूर): येथील जिल्हा परिषद प्रशालेतील तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापकांनी काही विद्यार्थ्यांच्या टीसी पालकांना न विचारातच इतर शाळांना दिल्या. याबाबत पालक, शालेय समितीला कोणतीही कल्पना दिलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत व शालेय समितीने तत्कालीन मुख्याध्यापकांच्या चौकशीची मागणी सीईओंकडे केली होती. त्यानुसार बुधवारी शाळेच्या गेटला कुलूप लावण्यात आले.
हंरगुळ खु. येथे जिल्हा परिषद प्रशाला असून, तिथे पहिले ते दहावीचे वर्ग आहेत. गावातील पालक मुलीची टीसी काढण्यासाठी शाळेत गेले असता त्यांना मुलीची टीसी यापूर्वीच काढून नेल्याचे सांगण्यात आले. त्यांनी ही बाब शालेय समिती, ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार शाळेत तपासणी केली असता १७ विद्यार्थ्यांच्या टीसी इतर शाळांना परस्पर देण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापक तथा शिक्षक अण्णा श्रीरंग नरसिंगे यांची चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत व शालेय समितीने ठराव घेऊन जि. प.च्या सीईओंकडे केली होती. मात्र, कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी बुधवारी शाळेच्या गेटला कुलूप लावले. गटशिक्षणाधिकारी निवृत्ती जाधव यांनी शाळेस भेट देऊन माहिती घेतली. मात्र, पालकांनी लेखी देण्याची मागणी केल्याने शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी शाळेस भेट देत पालकांची समजूत घातली. त्यानंतर शाळेचे कुलूप उघडण्यात आले.
शिक्षण विभागाकडून निलंबनाची कारवाईहरंगुळ खु. जि. प. शाळेतील शिक्षक तथा तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापक अण्णा नरसिंगे यांच्याबाबत मुलींचीही तक्रार होती. तसेच टीसी इतर शाळांना दिल्याचेही समोर आले होते. त्यामुळे शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, गटशिक्षणाधिकारी निवृत्ती जाधव यांनी बुधवारी शाळेस भेट दिली. दरम्यान, शाळेतील तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापक अण्णा नरसिंगे यांना निलंबित करण्यात आले असून, विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी सांगितले.