उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात उदगीर व जळकोट तालुक्यातील कोविड स्थितीचा आढावा व उपाययोजनासंदर्भात शनिवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश हरिदास, तहसीलदार राजेश्वर गोरे, पालिका मुख्याधिकारी राठोड डॉ. पवार, डॉ. देशपांडे, डॉ. प्रशांत चोले, डॉ. माधव चंबुले, सुधीर जगताप, डॉ. बिराजदार, पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजी मुळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, राजेश्वर निटूरे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, शिवसेनेचे चंद्रकांत टिंगटोल उपस्थित होते.
राज्यमंत्री बनसोडे यांनी मुख्यत: ऑक्सिजन, रेमडेसिविर व कोरोना सेंटर्सबाबत आढावा घेतला. उदगीर व जळकोट तालुक्यातील लॉकडाऊनविषयी माहिती घेऊन येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासंबंधी आवश्यक सूचना केल्या. ऑक्सिजन, रेमडेसिविरबाबत खाजगी आणि शासकीय रुग्णालयांनी चांगले समन्वय ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी तहसीलदारांनी एक विशेष अधिकारी नियुक्त करावा. उदगीरात रुग्णांना बेड उपलब्ध व्हावा म्हणून हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करावा. कोरोना सेंटर्स, हॉस्पिटल्स आणि डेडिकेटेड हॉस्पिटल येथे विद्युत सेवा सुरळीत ठेवावी. फायर ऑडिट करुन घ्यावेत, कोणत्याही कारणास्तव रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी.
समन्वयाबरोबर सुसंवादही ठेवावा...
राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अविरत काम करणारे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या आरोग्य व आयुष्याला प्राधान्य देऊन एकमेकांच्या समन्वयात राहण्याबरोबरच सुसंवाद राखणेही आवश्यक आहे. खाजगी डॉक्टरांनी ऑक्सिजन व रेमडेसिविरबाबत शासनाच्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित आहे. आवश्यक असेल तेव्हांच रुग्णांना या औषधी व ऑक्सिजन देण्यात यावे. खाजगी दवाखान्यात उपलब्ध असलेले रिकामे ऑक्सिजन सिलेंडर त्वरित परत करावे. वाढती रुग्ण्संख्या लक्षात घेता जम्बो सिलेंडर खरेदी करावे, असेही ते म्हणाले.