लातूर : जिल्हा परिषदेअंतर्गतच्या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र ठरणाऱ्या गट ड आणि क मधील कर्मचाऱ्यांना बढतीची उत्सुकता लागली होती. सोमवारी पदोन्नती समितीची बैठक होऊन पाच विभागातील १० संवर्गातील शंभर कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनापूर्वी बढतीची भेट मिळाल्याने या कर्मचाऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे.
शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी सप्टेंबरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती अंतर्गतच्या गट ड आणि क मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठीची प्रक्रिया राबविण्यात येते. गट ड मधील क मध्ये, तर क मधील कर्मचाऱ्यांना त्याच गटात वरिष्ठ पदावर बढती दिली जाते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने ३० सप्टेंबरपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची संख्या जाणून घेऊन तयारी केली होती. त्यामुळे यादीत नावे असलेल्यांना उत्सुकता लागली होती.
सर्वाधिक लाभ आरोग्य विभागास...जिल्हा परिषद, पंचायत समिती अंतर्गतच्या शंभर कर्मचाऱ्यांची बढती झाली आहे. त्यात सामान्य प्रशासन विभागातील २३, कृषीतील ४, पशुसंवर्धनमधील ३, आरोग्य विभागातील ५६ तर पंचायत विभागातील १४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी सीईओ अनमोल सागर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे, समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, कृषी विकास अधिकारी सुभाष चोले, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, पंचायतचे डेप्युटी सीईओ दत्तात्रय गिरी यांची उपस्थिती होती.
'शिक्षण'चे नेहमीप्रमाणे पाढे...पदोन्नती प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने नेहमीप्रमाणे विलंबाने प्रस्ताव सादर केले. त्यामुळे छाननीस उशीर झाला. त्यामुळे सोमवारी रात्री ७.३० वा. पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. परिणामी, बुधवारी तपासणही होऊन मंजुरी मिळेल, असे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले. त्यामुळे मुख्याध्यापकांची पदोन्नतीची उत्सुकता कायम आहे. दरम्यान, आपलाच विभाग कसे काय मागे राहतो, अशी चर्चा शिक्षकांतून होत होती.