लातूर : जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदाेलन सुरू हाेते. दरम्यान, पाेलिसांनी आंदाेलकांवर लाठीहल्ला केला. लातूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही या लाठीचार्जचे तीव्र पडसाद उमटले.
याच्या निषेधार्थ मराठा समाजबांधवांच्या वतीने उदगीर, तगरखेडा (ता. निलंगा) येथे आंदाेलन करण्यात आले. तर, किल्लारी (ता. औसा), शिरूर ताजबंद (ता. अहमदपूर) आणि तांदुळजा (ता. लातूर) येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. दिवसभर येथील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली हाेती. परिणामी, सर्वच व्यवहार ठप्प झाले हाेते. दरम्यान, अहमदपूर आणि औराद शहाजानी येथे साेमवारी बंदची हाक देण्यात आली आहे.
लांब पल्ल्याची बससेवा ठप्प; ४३२ फेऱ्या रद्द... -महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने खबरदारी म्हणून लांब पल्ल्याच्या मार्गावरील बससेवा गत दोन दिवसांपासून बंद केली आहे. मात्र, जिल्ह्यातील काही मार्गावर बससेवा सुरू आहे. लातूर आगाराच्या ५६४ फेऱ्यांपैकी २३२ बसफेऱ्या शनिवारी झाल्या. यातील ३३२ फेऱ्या रद्द केल्या आहेत. दरम्यान, रविवारी लातूर जिल्ह्यातील अंतर्गत मार्गावर बस सुरू केल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.