लातूर : शहरातील विलासराव देशमुख मार्गावर असलेल्या श्री देशीकेंद्र विद्यालयाच्या समोरील भुयारी मार्गात गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असून, मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवारी रात्री टेंबे लावून आंदोलन करण्यात आले.
शहरातील विलासराव देशमुख मार्गावर विविध शाळा, महाविद्यालये आहेत. या मार्गावर विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या उड्डाणपुलाच्या खाली भुयारी मार्ग असून, त्यातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी या मार्गातून जाण्यास भीती वाटत आहे. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असून, लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीने मंगळवारी रात्री टेंबे लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज अभंगे, अर्जुन कोळी, जहांगीर शेख, ॲड. चापोलीकर, परमेश्वर पवार, दत्ता म्हेत्रे, अजिंक्य मोरे, गोविंद उदगिरे, युवराज चापोलीकर, आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.