लातूर : मराठा समाजास तात्काळ आरक्षण द्यावे, या मागणीसाठी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उमरदरा येथील व्यंकटराव नरसिंग ढोपरे यांनी पुण्यातील इंद्रायनी नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा शनिवारी संपविली. रविवारी त्यांचा मृतदेह येथील तहसील कार्यालयासमोर आणून ठेवण्यात आला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पावित्रा नातेवाईकांसह आंदोलकांनी पावित्रा घेतला.
मराठा समाजास तात्काळ आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करीत दोन तासांपासून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुुरु करण्यात आले आहे. यावेळी आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी निकेतन कदम, तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या शासनाकडे पाठविण्यात येतील असे सांगून समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यावेळी शहरासह तालुक्यातील विविध गावांतील आंदोलक उपस्थित आहेत.