रेणापूर : तालुक्यात दुष्काळी उपाययोजना राबविण्यात याव्यात तसेच साखर कारखान्यांनी शिल्लक असलेला ऊस तात्काळ गाळपासाठी न्यावा यासह विविध मागण्यांसाठी रेणापूर तहसील कार्यालयासमोर गजानन बोळंगे यांच्या नेतृत्वाखाली किसान सेना व शेतकऱ्यांच्या वतीने दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
रेणापुर तालुक्यात शासनानेही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणत्याच उपाययोजना राबविण्यात येत नसल्याचे चित्र आहे. पिकविमा देण्यात यावा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, चारा छावण्या सुरु कराव्यात, कर्जमाफी करावी, कर्ज वसूलीस स्थगिती द्यावी, पनगेश्वर कारखाना बंद असल्याने येथील सभासदांचा ऊस वाळून जात आहे. त्यामुळे इतर कारखान्यांनी हा ऊस गाळपास न्यावा, शेअर्स भरलेले पैसे कारखान्याने परत करावेत, आदी मागण्यांसाठी शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच रेणापूर-पिंपळफाटा येथेही रास्ता रोको आंदोलन करण्यात आली. यावेळी शासनाच्या विराेधात घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी किसान सेनेचे अध्यक्ष गजानन बोरंगे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.