बोरगाव काळे ( लातूर) : पीकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट पीकविमा द्यावा. सरकारने रासायनिक खतांचे भाव कमी करावेत, शेती पंपांची वीज तोडणी तात्काळ थांबविण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी लातूर- मुरुड मार्गावरील लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथे बुधवारी सकाळी ११.३० वा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन तासभर झाले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
शेतकरी जगाचा पोशिंदा असतानाही सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शेतकरी विविध मार्गांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्यभर चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती. त्यास येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार जाधव, जिल्हाध्यक्ष धर्मराज शिंदे- पाटील, उपाध्यक्ष महारुद्र चौंडे, तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, विद्यार्थी परिषद आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर शेख, आंबऋषी काळे, विलास कारखान्याचे संचालक भारत आदमाने, करण साखरे, निळकंठ काळे, संदीपान फोलाने, बाळासाहेब मेनकुदळे, प्रकाश सोनपेठकर, आबासाहेब साखरे, भास्कर काळे, संतोष सोनपेठकर, ज्ञानेश्वर मायंदे, सचिन काळे, गणेश चौंडे, प्रेमचंद पाचपिंडे, परमेश्वर काळे आदी उपस्थित होते.
प्रस्तावित वीज दरवाढ थांबवावी...शेतीमालासाठी किमान हमीभाव व कायदा मंजूर करून घेण्यात यावा, प्रास्तावित वीज दरवाढ थांबवावी, भूसंपादनाचा मोबदला पूर्वीप्रमाणे देण्यात यावा, देशातील १५ लाख मे. टन सोया पेंड निर्यात करावी. तेलबिया व खाद्यतेलावर ४० टक्के आयात शुल्क लावावा, सोयाबीनला किमान ८ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा. ऊसाला एफआरपीची एकरकमी रक्कम तात्काळ मिळावी. बुलढाणा येथे शेतकरी, कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन मुरुडचे मंडळ अधिकारी अनिल सूर्यवंशी, सपोनि धनंजय ढोणे यांना देण्यात आले. व्हीएस पँथरचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला.