लातूर : अतिशय कमी किमतीत म्हाडाची घरे मिळवून देताे, असे आमिष दाखवत परभरणी जिल्ह्यातील एका भामट्याने लातुरातील तिघांना गंडविल्याची घटना समाेर आली आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील काॅईलनगर येथील बालाजी तुळशीराम कांबळे यांच्यासह अन्य दाेघांना शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात दिलेल्या जबाबात म्हटले आहे. परभणी जिल्ह्यातील काेद्री (ता. गंगाखेड) येथील नवनाथ महादेव सावंत याने तक्रारदारांना भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे फाेन करून बाेलावून घेतले.
या तिघांना त्याने अतिशय कमी किमतीत म्हाडाची घरे मिळवून देताे, असे म्हणून प्रत्येकी ४० हजार रुपयांची मागणी करत ते पैसे घेतले. तर विलास विठ्ठल बनसाेडे (रा. रमाईनगर, लातूर), श्रीकांत उत्तम दणदिवे (रा. गाैतमनगर, लातूर) आणि बालाजी तुळशीराम कांबळे यांच्याकडून एकूण १ लाख २० हजार रुपये उकळत गंडविले. वारंवार घरांची मागणी करूनही त्यांनी घर दिले नाही. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. शिवाय, दिलेले पैसे तरी परत द्या, अशी मागणी केल्यानंतरही पैसे दिले नाही, शेवटी तक्रारदारांनी पाेलिस ठाण्यात धाव घेतली.
याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन नवनाथ महादेव सावंत याच्याविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी दिली.