- हरी मोकाशे (लातूर)
दीपावलीच्या पाडव्या दिवशी सर्वच शेतमालाला उच्चांकी दर मिळाला़ यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने आणि शेती उत्पादन घटल्याने तुरीच्या दरात आणखीन वाढ होण्याची आशा व्यक्त होत असताना या शेतमालाच्या दरात अल्पशी घसरण झाली आहे़ मुग, सोयाबीनचा दर मात्र स्थिर आहे़ सोयाबीनला सध्या ३ हजार ४८१ रुपये असा भाव मिळत आहे़
आवक घटली की दरात वाढ होते, हा बाजारपेठेतील सर्वसाधारण नियम आहे़ लातूर जिल्ह्यात नगदी पीक म्हणून प्रामुख्याने सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते़ त्यापाठोपाठ तुरीचा पेरा असतो़ यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने खरीपातील शेतमालाच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे़ त्यामुळे सोयाबीनला सुरुवातीपासूनच ३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत होता़ यंदा सोयाबीनला दर चांगला असला तरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
शासनाने सोयाबीनला ३ हजार ३९९ रुपये अशी आधारभूत किंमत जाहीर केली असली तरी गत आठवड्यापासून खुल्या बाजारपेठेतील दर ३ हजार ४८१ रुपये पोहोचले आहेत़ त्यामुळे शेतकरी बाजारपेठेत सोयाबीन विक्री करीत आहेत़ शेतकऱ्यांच्या पदरी प्रति क्विं़ ज्यादा ४८० रुपये पडत आहेत़सध्या बाजारपेठेत गत वर्षीतील तुरीची आवक थोड्याफार प्रमाणात सुरु आहे़ दैनंदिन १६९ क्विं़ होणारी आवक स्थिर असली तरी गत आठवड्याच्या तुलनेत सध्या कमाल दरात ४०० रुपयांनी घट झाली आहे़ मुगाची आवक निम्म्याने घटली असून ६५२ क्विं़ आवक होत आहे़ कमाल दरात ७० रुपयांनी वाढ झाली असली तरी सर्वसाधारण दर स्थिर असून तो ५ हजार रुपये आहे़
बाजारपेठेत उडदाचीही आवक घटली आहे़ गत आठवड्याच्या तुलनेत कमाल दरात ५८३ रुपयांची घट झाली आहे़ सध्या ५ हजार २४० रुपये असा भाव मिळत आहे़ दरम्यान, पिवळ्या ज्वारीची आवक घटत असून दरात मोठी वाढ होत आहे़ सध्या २५३ क्विं़ आवक असून कमाल दर ४ हजार ६२० रुपयांपर्यंत पोहोचला आहे़ सध्या बाजारपेठेत बाजरीस प्रति क्विं़ १८००, गहू- २३००, हायब्रीड ज्वारी- १४००, रबी ज्वारी- ३५००, मका- १३००, हरभरा- ४ हजार ५५०, करडई- ३६५०, तीळ- १२ हजार ५००, गुळ- २ हजार ८९५, धन्यास ४ हजार ५०० रुपये दर मिळत आहे़
शासनाने मुगास ६ हजार ९७५ रुपये आधारभूत किंमत जाहीर केली आहे़ परंतु, बाजारपेठेत भाव हा हमीभावाच्या जवळपासही एकदाही पोहोचला नाही़ त्यामुळे ज्यांच्याकडे मुग आहे, असे शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री करीत आहेत़ तसेच उडीद विक्रीसाठी अडीच हजार शेतकऱ्यांची नोंदणी असली तरी प्रत्यक्षात ३७ शेतकऱ्यांची १८९ क्विं़ खरेदी झाली आहे़ सोयाबीन विक्रीसाठी ७ हजार ७६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे़ प्रत्यक्षात ११ पैकी एका केंद्रावर ११ शेतकऱ्यांची १०६ क्विं़ खरेदी झाली आहे़ खुल्या बाजारपेठेत सोयाबीन विक्री केल्यानंतर विनाविलंब हाती रक्कम पडत असल्याने शेतकऱ्यांचा कल बाजारपेठेकडे आहे़